Friday, 23 December 2016

लहान मुलांचा आहार

@ @ लहान मुलांचा आहार .@ @ kids  food

***** आयुर्वेदानुसार आहाराच्या दृष्टीने प्रमुख तीन अवस्था

* बाळ जन्मल्यापासून सहा महिने / सहा महिने एक वर्षापर्यंत क्षीराद,
* एक ते तीन वर्षांपर्यंत क्षीरान्नाद
* तीन वर्षांपासून अन्नाद

***** पहिले सहा महिने पर्यंतच्या मुलांसाठी आहार *****

बाळाला आईच्या दुधाशिवाय दुसरे काहीही देऊ नये. आईचे दुध हे बाळासाठी सर्वात शुद्ध, उत्तम व अमुल्य अन्न होय.

** आईला भरपूर दुध येत नसल्यास काय करावे-

* पहिले अन्न व पाणी घेऊन तिने बाळाला आपले स्तन चोखावयास देणे. असे केल्यास कित्येक वेळा दुध पुन्हा चालू होते.
* तेवढे करून दुध पूर्ण बंद झाले असेल, तर बाळाला बाहेरचे दुध चालु ठेवावे. यात गाय किंवा बकरीचे दुध सर्वात उत्तम.
* बाटलीने दुध पाजणे हे बाळाच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे. बरेच वेळा अस्वच्छते मुळे उलटया, जुलाब होऊन बाळाच्या शरीरातील पाणी कमी होते. त्यामुळे बाळाचा मृत्यू देखील होवू शकतो.
* बाळासाठी दुध विकत घेणे परवडत नसेल तर तांदूळ, नाचणी, मका, पोहे इ. मध्ये वेगवेगळ्या डाळी व तूप घालून शिजवून भरडीसारखी करून पाजावे.
* बाळाला नुसती भाताची पेज देवून उपयोग नाही तर त्याबरोबर दाल व इतर कडधान्यासारखा जास्त प्रथिनयुक्त आहार दयावा. नुसत्या भातावर वाढलेली मुले अशक्त राहण्याचा संभव असतो

*****  ६ व्या महिन्यापासुन पूरक आहार - सुरुवातीला द्राव पदार्थ नंतर सैल पदार्थ आणि नंतर घट्ट पदार्थ

* द्रव पदार्थ – (६-७ महिन्यांच्या बाळासाठी) दूध (गाईचे/ म्हशीचे), भाताची पेज, मुगाच्या डाळीचे पाणी, भाज्यांचे पाणी किंवा त्याचे केलेले सार, फळांचा रस इ.
* बाळाला वरचे दूध पाजताना वाटी- चमचाचा वापर करावा. दुधाची बाटली वापरू नये.
* सैल पदार्थ – (८-९ महिन्यांच्या बाळासाठी) नाचणी व सातूचे सत्त्व शिजवून घोटलेल्या घट्ट डाळी, त्याच्या पाण्याबरोबर बतात, रताळ्याची सुकवून केलेली पूड आणि त्याची केलेली पेज इ.
* घट्ट पदार्थ – (९-१२ महिन्यांच्या बाळासाठी) दाल तांदळाची पेज, केळ कुस्करून नंतर रताळ्याची खीर, रव्याची खीर इ.

***** ६ महिने ते १ वर्षापर्यंतच्या मुलांसाठी आहार *****

** नाचणी सत्त्व

साहित्य : नाचणीचे पीठ २ छोटे चमचे, दही १ छोटा चमचा, पाणी दोन      वाट्या, मीठ चवीनुसार, हिंग पूड चिमुटभर, साजूक तूप १ छोटा चमचा.
कृती : नाचणी स्वच्छ निवडून त्याला पाणी लावून थोडा वेळ बांधून ठेवावी. नंतर ती थोडी कुटावी म्हणजे त्याची साले निघतील. मग दळून त्याचे पीठ करावे त्याला सत्त्व म्हणतात. एका छोटया पातेल्यात दोन चमचे नाचणीचे पीठ. त्यात दही, मीठ ,हिंगपूड, पाणी घालून चांगले हलवून घ्या. नंतर ते मंद आचेवर      शिजवा. शिजवताना सारखे हे मिश्रण हलवत रहा. पातेले खाली उतरवून त्यात साजूक तूप घालून सोसेल असे गरम गरम खायला दया.

** नाचणीचे सत्त्व दूध घालून -

साहित्य : नाचणीचे पीठ २ चमचे, साखर दीड चमचा, दूध दीड कप, साजूक तूप १ छोटा चमचा
कृती :  नाचणीच्या पिठात प्रथम २ चमचे पाणी घालून पिठातील गाठी काढून टाका. नंतर त्यात गार दूध घाला व शिजवत ठेवा. शिजवताना पीठ चमच्याने हलवत रहा. साखर घालून पीठ खाली उतरवा. दूध कमी प्रमाणात असल्यास निम्मे दूध व निम्मे पाणी घाला.
बाजारात मिळणारा राजगिरा आणून स्वच्छ करून घ्यावा. त्याला पाण्याचा हलकासा हात लावून स्वच्छ कापडावर पसरून ठेवा. २ तासानंतर हा राजगिरा कढईत भाजावयाचा आहे. त्यासाठी लहान काठीला, लाटण्याला किंवा ताक घुसळण्याच्या रवीला स्वच्छ फडके गुंडाळून त्याने मंद आचेवर ठेवलेल्या कढईत सतत हलवत राहा. प्रत्येक वेळी १/१ छोटा चमचा राजगिरा कढईत घाला.

टीप : ज्या ठिकाणी दूध वापरून पदार्थ करायचे आहेत, जर गाई – म्हशीचे दूध मिळाले नाही तर त्याऐवजी तुम्ही करडई, सोयाबीन किंवा ओला नारळ त्यापासून दूध तयार करू शकता.
करडई आणि सोयाबीनचे दूध – रात्री करडई किंवा सोयाबीन पाण्यात भिजत घाला. सकाळी उठल्यानंतर प्रथम पाणी काढून टाका, आणि थोडेसे पाणी घालून चांगले वाटून घ्या. वाटलेल्या मिश्रणातला चोथा काढून टाका. दूध तयार आहे.
ओल्या नारळाचे दूध – ओल्या नारळाचे खवून किंवा बारीक तुकडे करून घ्या. थोडेसे पाणी घालून वाटून घ्या. चोथा पिळून बाजूला काढा, नारळाचे दूध तयार.

** डाळ तांदळाची पेज

साहित्य : तांदूळ १ वाटी, मूगडाळ ०.५ (अर्धी) वाटी, जिरे २ चमचे, तूप १ छोटा चमचा, मीठ, पाणी.
कृती : डाळ व तांदूळ दोन्ही स्वच्छ धुऊन सावलीत वाळत घाला. सुकल्यानंतर मंद आचेवर भाजून त्याचा रवा काढा. दळताना त्यात जिरे घाला. पेज करायच्या वेळेला २ छोटे चमचे दळलेले पीठ आणि तूप एकत्र करून मंद आचेवर भाजून घ्या. नंतर त्यात पाणी आणि मीठ घालून पेज शिजवून घ्या. गरम असताना खायला घ्या.

** बटाटयाची पेज

साहित्य : बटाटयाचा कीस (सुकवलेला) दीड चमचा, मीठ चवीप्रमाणे, हिंग चिमूटभर, जिरे पूड चिमूटभर, दही १ छोटा चमचा, पाणी.
कृती : बटाटे किसून तो वाळवून त्याची पूड करून ठेवावी. दीड चमचा बटाटयाची पूड, मीठ, हिंग, जिरे पूड, दही, पाणी एकत्र करून मंद आचेवर शिजवावे, गरम असतानाच खायला दयावे.
टीप : बटाटयाऐवजी रताळे सुद्धा वापरू शकता, रताळ्याची पेज दूध साखर घालूनही करता येते. दीड चमचा छोटया रताळ्याचा सुकवलेला कीस, १ कप दूध, दीड ते दोन छोटे चमचे साखर एकत्र करून गरम केल्यावर रताळ्याची पेज तयार.

** राजगिऱ्याच्या लाह्या

साहित्य : राजगिऱ्याच्या लाह्या १ मोठा चमचा, दूध १२ कप, साखर २ चमचे.
कृती : राजगिऱ्याच्या लाह्या तयार करून ठेवाव्यात, बाजारात मिळणारा राजगिरा आणून स्वच्छ करून घ्यावा. त्याला पाण्याचा हलकासा हात लावून स्वच्छ कापडावर पसरून ठेवा. २ तासानंतर हा राजगिरा कढईत भाजावयाचा आहे. त्यासाठी लहान काठीला, लाटण्याला किंवा ताक घुसळण्याच्या रवीला स्वच्छ फडके गुंडाळून त्याने मंद आचेवर ठेवलेल्या कढईत सतत हलवत राहा. प्रत्येक वेळी १/१ छोटा चमचा राजगिरा कढईत घाला. त्या स्वच्छ करून त्याचे पीठ करून ठेवावे. राजगिऱ्याचे पीठ १ चमचा, साखर, दूध एकत्र कालवून लहान ८-१२ महिन्याच्या मुलांना खायला दयावे.
टीप : राजगिऱ्याच्या ऐवजी तुम्ही ज्वारीच्या लाह्याचे पीठ पण वापरू शकता. राजगिरा हा उष्ण असतो म्हणून हा हिवाळ्यातच खायला दयावा. राजगिऱ्याच्या लाह्या तयार करण्याची कृती प्रकरण ३ मध्ये वाचावी.

** रव्याची पेज (गोड)

साहित्य : रवा २ छोटे चमचे, दूध दीड कप, गुळ २-३ छोटे चमचे, तूप छोटा चमचा.
कृती : छोटया पातेल्यात रवा आणि तूप घालून मंद आचेवर भाजून घ्या. थोडासा लालसर रंग आला की, दूध साखर घालून शिजवा. ही पेज बशीत ओतून कोमट झाल्यावर बाळाला खायला दयावी. चमच्या चमच्याने भरवावी.
टीप : ही पेज दूध साखरेऐवजी ताक, जिरे आणि मीठ घालून पण करता येते. अशीच खीर तांदळाच्या रव्याची सुद्धा करता येते. कृती व साहित्य वरीलप्रमाणे.

** डाळ तांदळाची खिचडी

साहित्य : तांदूळ १ वाटी, मुगाची डाळ अर्धी वाटी, मीठ चवीप्रमाणे, साजूक तूप १ छोटा चमचा.
कृती : डाळ व तांदूळ एकत्र करून दोन वेळा धुऊन त्यात मीठ घालून भरपूर पाणी घालून शिजवून घ्या. ही खिचडी तूप घालून खायला दयावी. ह्या खिचडीमध्ये फळभाज्या आणि पालेभाज्या चिरून घातल्या तरी खिचडी चविष्ट लागते. फळभाज्यामध्ये कोबी, फ्लॉवर, दोडका, तोंडली इत्यादी. पालेभाज्यांमध्ये पालक, मेथी, शेवग्याची पणे, करडई, गाजर इत्यादी.

** नाचणीच्या पिठाचा शिरा

साहित्य : नाचणीचे पीठ १ वाटी, तूप २ मोठे चमचे, गुळ पाऊण वाटी, १ मोठा चमचा सुके खोबरे किसलेले, पाणी २ ते ३ वाट्या थोडे गरम करून घ्यावे.
कृती : नाचणीचे पीठ तूप एकत्र करून मंद आचेवर खरपूस भाजून घ्या. एका पातेल्यात पाणी गरम करून घ्या. भाजलेल्या पिठात थोडे थोडे पाणी   घालून शिजवून घ्या. नंतर त्यात गुळ घालून हलवून घ्या. किसलेले खोबरे घालून हलवून घ्या आणि गरम गरम खायला दया.

***** एक ते तीन वर्षापर्यंतच्या मुलांसाठी आहार *****

** गव्हाच्या पिठाचा शिरा

साहित्य : गव्हाचे पीठ १ वाटी, तूप ३ मोठे चमचे, गुळ पाऊण वाटी, सुके खोबरे २ छोटे चमचे, पाणी.
कृती : एका कढईत तूप पातळ करून घ्या. त्यात न चाळलेले गव्हाचे पीठ घालून खरपूस भाजून घ्या. नंतर दीड ते २ वाट्या पाणी गरम करायला ठेवा. पाणी गरम झाल्यावर ते भाजलेल्या गव्हाच्या पिठात घाला. पीठ शिजले की त्यात पाऊण वाटी गुळ ( किसलेला ) घालून शिरा चांगला हलवून घ्या. खायला देताना त्यात सुके खोबरे घालून खायला दयावे.
टीप : हा शिरा गव्हाचा रवा (बलगर/दलिया ) वापरून करू शकता. त्यासाठी पाणी जास्त लागते. कृती साहित्य वरीलप्रमाणे.

**राजगिऱ्याचा शिरा

साहित्य : राजगिरा १ वाटी, तूप २ मोठे चमचे, गुळ पाऊण वाटी, पाणी.
कृती : राजगिऱ्याचा रवा काढून घ्या. राजगिऱ्याचा रवा व तूप एकत्र करून खमंग भाजून घ्या. पाणी गरम करून त्यात घाला. राजगिरा शिजल्यानंतर त्यात गुळ घालून सारखा करा आणि खायला दया.
टीप : राजगिरा हा उष्ण असतो म्हणून हा हिवाळ्यातच खायला दयावा.

** वऱ्याच्या तांदळाचा शिरा

साहित्य : वऱ्याचे तांदूळ १ वाटी, साखर १ वाटी/ गुळ १ वाटी, तूप २ मोठे चमचे, सुके खोबरे २ मोठे चमचे ( किसलेले)
कृती : वऱ्याचा तांदूळ जाडसर दळून घ्या. हे पीठ चाळू नये. पीठ तुपावर तांबुस भाजावे. जेवढे पीठ असेल त्याच्या दुप्पट पाणी घालावे आणि नेहमीच्या शिऱ्याप्रमाणे हा शिरा करावा. त्यात सुके खोबरे, साखर/ गुळ घालून हलवून गरम गरम खायला दयावा.

** गव्हाच्या पौष्टिक वड्या

साहित्य : गव्हाचा रवा २ वाटया, तूप २ मोठे चमचे, गुळ २ वाटया
कृती : तूप व गुळ एकत्र मंद आचेवर ठेवावे. गुळ विरघळल्यानंतर त्याला छोटे   बुडबुडे येईपर्यंत थांबा. नंतर त्यात थोडे थोडे करून गव्हाचे पीठ घाला आणि हलवत रहा. ह्या सर्व मिश्रणाचा गोळा तयार झाला की खाली उतरवून थाळीत थापून घ्या. नंतर त्याच्या वडया पाडा.
टीप : गव्हाच्या पिठाऐवजी बाजरीचे पीठ वापरू शकता. कृती आणि साहित्य वरीलप्रमाणे.

** डाळ पोहे

साहित्य : चणा १ वाटी, जाड पोहे २ वाटया, कांदा १ वाटी, हिरव्या मिरच्या ३-४, कढीपत्ता १५-२० पाने, लिंबाचा रस १ मोठा चमचा, तेल ३ मोठे चमचे, मीठ, साखर चवीप्रमाणे, फोडणीचे साहित्य, खोबरे व कोथिंबीर हवी असल्यास.
कृती : चणा डाळ २ ते ३ तास भिजवून जाडसर वाटून घ्या. पोहे धुऊन ठेवा. तेलाची फोडणी करून मिरच्याचे तुकडे, कढीपत्ता, चिरलेला कांदा घालून परतून घ्या. वाटलेली डाळ घालून ढवळून वाफ दया. पोह्यावर मीठ, साखर घालून कालवा आणि फोडणीत घाला. नंतर लिंबाचा रस घालून हलवून घ्या आणि गरम गरम खायला दया.
टीप : चणा डाळीच्या ऐवजी तुम्ही मोड आलेली कडधान्ये, ताजा हरभरा, ताजे मटार, कोबी, गाजर इ. चे तुकडे वापरू शकता. कोबी वापरल्यास कांदा वापरण्याची गरज नाही.

** पोहे भेळ

साहित्य : जाड पोहे २ वाटी, चणा डाळ अर्धी वाटी, बारीक चिरलेला कांदा अर्धी वाटी, बारीक चिरलेली काकडी १ वाटी, मोड आलेले मूग १ वाटी, हिरवी मिरची १ मोठा चमचा बारीक चिरलेली, कोथिंबीर १ वाटी, लिंबाचा रस २ मोठे चमचे, चवीपुरते मीठ आणि साखर तेल १ मोठा चमचा.
कृती : चणाडाळ २ ते ३ तास भिजत घालून – निथळून पाणी न घालता किंचित मीठ चोळून ठेवा. मोड आलेल्या मुगाला सुद्धा मीठ चोळून पाणी न घालता कुकरमध्ये शिजवून घ्या. १ मोठा चमचा तेल घालून त्यात पोहे चांगले कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या. पोहे गरम असतानाच मीठ साखर लावून ठेवा. खायला देताना पोहे, छान डाळ, मूग काकडी, कांदा, मिरची, कोथिंबीर, लिंबाचा रस एकत्र करून खायला दया.
टीप : चणा डाळ नको असल्यास तुम्ही वगळू शकता. खायच्या वेळेलाच भेळ कळवावी. अन्यथा सादळते.

** पौष्टिक भेळ

साहित्य : ज्वारीच्या लाह्या १ वाटी, साळीच्या लाह्या १ वाटी, राजगिरा लाह्या, मक्याच्या लाह्या १ वाटी, मोड आलेले मूग १ वाटी, कच्चा कोबी अर्धी वाटी, काकडी पाव वाटी, कोथिंबीर २ मोठे चमचे, लिंबाचा रस १ मोठा चमचा. मीठ साखर चवीप्रमाणे
कृती : खायला द्यायच्या वेळेला सर्व पदार्थ एकत्र करून चांगले कालवून खायला दया.

** नाचणी उपमा

साहित्य : नाचणी १ वाटी, हरभरा डाळ पाव वाटी, शेंगदाणे पाव वाटी, बारीक केलेली हिरवी मिरची ३-४, कोबी व गाजराचे तुकडे अर्धी वाटी, मीठ चवीप्रमाणे, तेल १ चमचा, फोडणीचे साहित्य.
कृती : नाचणी ५-६ तास भिजत घालावी. हरभरा डाळ आणि शेंगदाणे भिजवून ठेवावे. नाचणीचे पाणी काढून पाणी न घालता कुकरमध्ये वाफवून घ्यावेत. कढईत तेल घालून फोडणी करून घ्यावी. त्या फोडणीत भाज्यांचे तुकडे शिजवून घालावेत. नंतर नाचणी घालून त्यात मीठ, हिरवी मिरची, भिजवलेली डाळ व दाणे घालून परतावे. त्यावर कोथिंबीर घालून खायला दया.

** साळीच्या लाह्यांचा उपमा

साहित्य : १ मोठी वाटी भरून साळीच्या लाह्यांचा रवा, कढीपत्ता ४-५ पाने, जिरे अर्धा चमचा, हळद पाव चमचा, लिंबाचा रस अर्धा चमचा, कोथिंबीर १ मोठा चमचा, तेल अर्धा चमचा.
कृती : साळीच्या लाह्या बारीक करून घ्या. अर्धा चमचा तेल कढईत टाकून त्यात जिरे, हळद, कढीपत्ता घालून सर्व हलक्या हाताने भाजा. मग त्यात पाव वाटी पाणी घालून अंदाजे मीठ घाला. नंतर लाह्याचा रवा घालून हलक्या हाताने हलवून खायला दया.

** सोयाबीन चटपटीत दाणे

साहित्य : सोयाबीन २ वाटया, हळद पूड १ छोटा चमचा, तेल २ चमचे, मीठ चवीप्रमाणे.
कृती : २ ते ३ तास सोयाबीन पाण्यात भिजवून ठेवा. नंतर बाहेर काढून पाणी निथळून घ्या. निथळलेल्या सोयाबीनला मीठ व हळद लावून रात्रभर थंड जागेत ठेवा. सकाळी त्या दाण्यांना तेल लावून थोडे थोडे कढईत घेऊन मंद आचेवर भाजून कुरकुरीत झाले की काढून घ्या. मुठ भरून सोयाबीन चटपटीत दाणे खाल्ल्यानंतर आपल्या शरीराला खालील पोषक द्रव्य मिळतात.

** गव्हाच्या रव्याचा उपमा (दलिया)

साहित्य : गव्हाचा जाडसर रवा १ वाटी, भिजवलेले शेंगदाणे अर्धी वाटी, हिरवी मिरची २-३, कढीपत्ता ८ ते १० पणे, कांदा बारीक चिरलेला १, चवीप्रमाणे मीठ व साखर, तेल १ मोठा चमचा, फोडणीचे साहित्य आणि १ चमचा उडदाची डाळ.
कृती : गव्हाचा जाडसर रवा खमंग वास येईपर्यंत भाजून घ्या. त्यात पाणी घालून चांगले शिजवून घ्या. कढईत तेल घालून मोहरी, हिंग, हळद, उडदाची डाळ, कढीपत्ता, मिरच्या, कांदा, भिजवलेले दाणे घालून चांगले परतवून घेणे. शिजवलेला गव्हाचा रवा फोडणीत घाला व चांगले हलवा. लिंबाचा रस, मीठ, साखर घालून आणि खायला दया.
टीप : गव्हाच्या रव्याऐवजी बाजरीचा रवा आपण वापरू शकता. कृती आणि साहित्य वरीलप्रमाणे.

** शेंगदाण्याची चिक्की

साहित्य : शेंगदाणे २ वाटया, गुळ दीड वाटी, तेल २ छोटे चमचे
कृती : ही चिक्की दोन प्रकारे करता येते. अख्ख्या शेंगदाण्याची किंवा दाणे बारीक करून दाण्याच्या कुटाची. शेंगदाणे भाजून घ्या. गुळ बारीक करून घ्या. कढईत दोन छोटे चमचे तेल घाला. त्यात चिरलेला गुळ विरघळेपर्यंत थांबा. गुळाला बारीक बुडबुडे आल्यानंतर त्यात शेंगदाणे कूट घाला. हलवून लगेचच तेल लावलेल्या ताटात घालून घ्या आणि सुरीने कापून वडया पाडा.

** शेंगदाण्याचा लाडू

साहित्य : भाजलेले शेंगदाणे १ वाटी, तूप २ छोटे चमचे, गुळ बारीक चिरलेला १ वाटी
कृती : भाजलेले शेंगदाणे, गुळ एकत्र करून खलबत्त्यात कुटावे. शेंगदाणे बारीक झाल्यावर सर्व मिश्रण चांगले कालवून त्याचे छोटे छोटे लाडू वळावेत. कुटलेले मिश्रण कोरडे झाले असेल तर त्यात थोडेसे तूप मिसळा आणि लाडू वाळा.

** नाचणीचा हलवा

साहित्य : नाचणी चीक १ वाटी, दूध १ वाटी, तूप २ मोठे चमचे, गुळ १ वाटी बारीक चिरलेला.
कृती : दुधात चिरलेला गुळ घालून तो विरघळल्यानंतर त्यात नाचणीचा चीक घाला. कढईत तूप घालून वरील सर्व मिश्रण कढईत  घाला. सारखे हलवत राहा. ह्या मिश्रणाचा गोळा होऊन तुओ सुटेपर्यंत हलवा आणि लगेच तो गोळा ताटलीत थापून त्याच्या वडया कापा.
टीप : नाचणीचा चीक कसा काढायचा ह्याची कृती नाचणीच्या कुरडईच्या कृतीप्रमाणे करावी. गव्हाच्या चिकाचा सुद्धा हलवा करता येतो. कृती साहित्य वरीलप्रमाणे.

** पपईचा कीस

साहित्य : कच्ची पपई – पपई साल काढून किसून घ्या. २ वाटया, तूप / तेल २ छोटे चमचे, हिरवी मिरची २-३ बारील चिरलेली, जिरे अर्धा चमचा, दाण्याचे कूट, कोथिंबीर अर्धी वाटी, मीठ साखर चवीप्रमाणे.
कृती : कढईत तेल किंवा तूप आवडीप्रमाणे घ्या. त्यात जिरे मिरची घाला आणि मग त्यात किसलेली पपई घाला. चांगले हलवून मीठ साखर घाला आणि खीस शिजू दया. नंतर त्यात दाण्याचे कूट, कोथिंबीर घालून हलवून खायला दया.
टीप : हा कीस उपवासाला चालतो. पपईप्रमाणे बटाट्याचा किंवा रताळ्याचा कीस करता येतो. कृती व साहित्य वरीलप्रमाणे.

** तांदळाच्या रव्याचा शिरा

साहित्य : तांदळाचा रवा १ वाटी, तूप – दीड मोठा चमचा, गुळ – पाऊण वाटी, सुके खोबरे – २ छोटे चमचे, पाणी २ वाटया.
कृती : तांदळाचा रवा तूप घालून खमंग भाजून घ्या. वेगळ्या भांड्यात पाणी गरम करून घ्या. भाजलेल्या रव्यात पाणी घालून शिजवा. लगेच त्यात गुळ घाला. शिजल्यानंतर किसलेले खोबरे घाला आणि लगेच खायला दया.

** तांदळाच्या रव्याचे उपीट

साहित्य : तांदळाचा रवा १ वाटी, लिंबाचा रस – १ छोटा चमचा, कांदा १ लहान, पाणी २-३ वाट्या, मिरची २-३ बारीक चिरलेल्या, कोथिंबीर २ मोठे चमचे, सुके खोबरे २ मोठे चमचे, तेल १ मोठा चमचा. फोडणीचे साहित्य – उडदाची डाळ १ छोटा चमचा, कढीपत्ता ८-१० पाने बारीक चिरलेला, मीठ, साखर चवीप्रमाणे.
कृती : तांदळाचा रवा खमंग भाजून घ्या. नंतर कढईतून रवा काढून ठेवा. वेगळ्या भांडयात पाणी गरम करायला ठेवा. कढईत तेल घालून फोडणी करून त्यात मिरची, कांदा, कढीपत्ता, उडदाची डाळ घालून परतून घ्या. नंतर त्यात २ वाटया गरम पाणी घाला. त्या पाण्यात लिंबाचा रस, मीठ, साखर घाला. चांगली उकळी आल्यावर त्यात भाजलेला रवा घाला आणि शिजवून घ्या. नंतर त्यावर खोबरे आणि कोथिंबीर घालून खायला दया.

** नाचणीची कुरडई

साहित्य : नाचणी १ किलो, मीठ चवीप्रमाणे, पाणी.
कृती : नाचणी ४ दिवस पाण्यात भिजत घाला. गव्हाच्या कुरडया करताना जसे गहू वाटून घेतो तशीच नाचणी वाटून त्याचा चीक काढून घ्या. त्या चिकात चिकाइतके पाणी घालून तो चीक शिजवून घ्या. मीठ घालून चिकाच्या कुरडया तळ्ल्यानंतर खायला दयाव्यात. या कुरडया खूप पौष्टिक असतात.
टीप : गव्हाच्या कुरडईची जशी भाजी करतो तशी ह्या कुरडईची भाजी करू शकतो.

** नाचणीचे पापड

साहित्य : नाचणी पीठ, १ वाटी तेल, पाणी २ वाटया, पापड खार २ छोटे चमचे, साधे मीठ चवीप्रमाणे.
कृती : एका पातेल्यात पाणी, पापडखार, थोडे मीठ हे मिसळून कोमट करून घ्या. या गरम गरम मिश्रणात मावेल तेवढेच नाचणीचे पीठ घालून ढवळून त्याचा गोळा करून घ्या. हा गोळा २ मिनिटे झाकून ठेवा. हे मिश्रण ताटात काढून तेलाचा हात लावून चांगले मळून घ्या. या गोळ्याचे लहान लहान गोळे करून पोळपाटावर खाली प्लास्टिक पेपर पसरून त्यावर गोळा ठेवून त्यावरही प्लास्टिक पेपर ठेवा व पातळ लाटा व स्वच्छ कापडावर उन्हाच्या धगीत परंतु सावलीत वाळवा. हे पापड भाजून खाऊ शकता.
टीप : ह्याच प्रमाणात तांदळाचे पापड सुद्धा करता येतात.

** रताळ्याची पोळी

साहित्य :उकडलेली रताळी १ वाटी, गुळ सव्वा वाटी, कणीक, मोठे ४ चमचे तेल, २ मोठे चमचे मीठ, कणकेत घालण्यासाठी.
कृती :रताळे उकडून त्याची साल काढून त्यात गुळ घालून शिजवून घ्या. मिश्रण घट्ट होईपर्यंत ढवळा. नंतर पुरण यंत्रातून मिश्रण काढून घ्या किंवा पाट्यावर वाटून घ्या. कणकेत थोडे मीठ, तेल घालून पीठ थोडे सैलसर भिजवून घ्या. १५ मिनिटांनी कणकेचे छोटे गोळे तयार करा. रताळ्याचे सारण भरून त्याच्या पोळ्या लाटून घ्या. गरम तव्यावर दोन्ही बाजूंनी तेल सोडून खरपूस भाजून घ्या. गरम गरम खायला दया.
टीप : रताळ्या प्रमाणे बटाटा वापरून पण या सारखी पोळी करता येते. कृती व साहित्य वरील प्रमाणे.

***** तीन ते सहा वर्षाच्या चिमुकल्यांचा षडरसयुक्त संपूर्ण आहार *****

* तीन ते सहा वर्ष वय असणाऱ्या मुलांना सकाळच्या जेवणात ऋतुमानानुसार पालेभाज्या, कडधान्याच्या उसळी, पोळी, कोशिंबिर, ताक अशा आहाराची सवय मुलांने लावणं गरजेचं आहे. * तीन ते सहा वर्ष वयोगटातील मुलांच्या आवडीनिवडी पुरेशा प्रमाणात निर्माण झालेल्या नसतात किंबहुना याच वयात त्याच्या खाण्यापिण्याच्या आवडीनिवडी विकसित होत असतात, त्यामुळे मुलांना योग्य तो आहार घेण्याची सवय लावणं याच वयात गरजेचं आणि सोप्पही असतं.
* मुलांना दुपारच्या जेवणात ऋतुनुसार फळे, साजूक तुपातले, डिंकाचे, मुगाचे अथवा राजगिऱ्याचे लाडू, मनुके, अंजीर, बदाम, काजू इत्यादी ड्रायफ्रूटचा वापर असणारे पदार्थ किंवा साळीलाह्यांचा, कुरमुऱ्यांचा किंवा शेंगदाण्याचा चिवडा द्यावा.
* रात्रीचं जेवण मात्र पचायला हलकं असेल याकडे लक्ष द्यावं, वेगवेगळे पराठे, घिरडे, तांदूळ किंवा मुगाची खिचडी, भाज्या किसून आणि वाफवून बनवलेली कोशिंबिर, उकडलेली अंडी आणि पोळी इत्यादींचा रात्रीच्या जेवणात समावेश असावा.
* तीन ते सहा वर्ष हा मुलांच्या बौद्धिक आणि मानसिक विकासाचा काळ असल्याने दूध, दुधाच्या पदार्थांचाही जेवणात योग्य प्रमाणात समावेश असावा. मुलांना जास्तीत जास्त गायीचं दूध देण्याकडे भर असावा.

***** हे टाळावं -

* या वयात मैद्याच्या पदार्थांसह मसालेदार पदार्थ मुलांना खाण्यास देण्यास शक्यतो टाळावं. पाव, ब्रेड, केक, यांच्या अति सेवनामुळे बद्धकोष्टतेचा धोका संभवत असल्याने आणि आतड्यांवर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता असल्याने अशा पदार्थांचा वापर कमीत कमी करावा. चॉकलेट, शीतपेयांचंही सेवन प्रमाणात असावं.
* हल्ली एज्युकेशनचा जमाना असल्याने आणि प्लेग्रुप नर्सरी, केजीच्या जमान्यात मुलांना वयाच्या तिसऱ्या वर्षांपासूनच शाळेत जावं लागतं. त्यामुळे त्यांचा जेवणाचा डबाही शारीरिक आणि मानसिक वाढीच्या दृष्टीने परिपूर्ण असावा.
* मुलांच्या डब्यात पदार्थ देताना त्यात विविधता असेल याची काळजी घेतली तर मुलंही आवडीनं खातात आणि अनेक पौष्टिक घटक मुलांना मिळतात. परिणामी मुलांवर टॉनिक, व्हिटामिनच्या औषधांचा होणारा भडीमार टाळता येऊ शकतो.

***** मुलांना बाहेरचे पदार्थ खाण्यास देण्यापेक्षा घरच्याघरी नवनवीन पदार्थ बनवून देता येऊ शकतात.

* मेथी किंवा कोबीचे पराठे, भाजणीचे, कांद्याचे पराठे, निरनिराळे सँडविच,
* तसेच मोड आलेल्या धान्याचे घिरडे मुलांच्या डब्यात दिल्यास मुलं सॉससोबत आवडीने खातात.
* बटाटा पोहा कटलेट, वाटाणा कटलेट तसेच विविध भाज्यांपासून बनवलेले कटलेट मुलांच्या डब्यात द्यावे.
* वाटलेल्या डाळीच्या पुऱ्या, लाल भोपळ्याच्या गोड किंवा तिखट पुऱ्या, नारळाची बर्फी, विविध प्रकारच्या चिक्की, डाळीचे तसेच रव्याचे लाडू, इडली, डोसा इत्यादी पदार्थ मुलांच्या डब्याला आलटून पालटून द्यावेत.

***** पोषाहार तयार करतांना घ्यायची काळजी -

* स्वयंपाकाची भांडी स्वच्छ धुतलेली असावीत. चुलीजवळील जागा लगेचच स्वच्छ करावी.
* जेवण तयार करण्यासाठी आणि पिण्यासाठी जे पाणी वापरले जाते ते झाकून ठेवलेले असावे. हे पाणी काढण्यासाठी ओगराळ्याचा वापर करावा.
* स्वयंपाक करत असताना नाकाला, केसांना हात लावू नये. हाताची नखे कायम कापलेली असावीत.
* स्वयंपाक करताना, लहान बाळाला जेवण देताना हात स्वच्छ धुऊन मग भरवावे.जर तुम्ही आजारी असाल, हाताला कापलेले असे, हातापायावर कुठे जखम असेल तर काळजीपूर्वक स्वयंपाक करावा.
* एका वेळेला जेवढे अन्न लागेल तेवढेच शिजवावे. कारण ताज्या अन्नात पोषण मुल्ये जास्त असतात.
* अन्न तयार झाल्यानंतर ते झाकून ठेवा. मुंग्या व इतर किडे लागू नयेत म्हणून मोठया थाळीत/ प्रतीत पाणी घालून त्यात शिजवलेले अन्न ठेवा.
* अन्न तयार करण्यासाठी वापरले जाणारे धान्य, भाजी स्वच्छ निवडून घ्यावी.
* फळभाज्या, पालेभाज्या आपण निवडून त्या निवडल्यानंतर २ ते ३ मिनिटे पाण्यात मीठ घालून त्यात बुडवून ठेवाव्यात. नंतर परत धुऊन मग भाज्या चिराव्यात. भाजी चिरल्यानंतर पाण्यात बुडवून ठेवू नका. त्यामुळे त्यातील जीवनसत्त्वे (‘क’ जीवनसत्त्व) नष्ट होतात.फळ, भाज्या ज्या आपण कच्च्या खाऊ शकतो त्या सालीसकट खाव्यात. त्यामध्ये भरपूर जीवनसत्त्व असतात.
*  पालेभाज्या शक्यतो लोखंडाच्या कढईत शिजवाव्यात, त्यामुळे लोह मिळते.
* डाळ, तांदूळ जास्त घासून धुऊ नये. तसे केल्यास त्यातील जीवनसत्त्वे नष्ट होतात.
* डाळी शिजवताना त्यात पालक, वंग, गवारीच्या शेंगा, मुलं, शेवगा, बटाटा यापैकी कुठल्याही भाज्या घालून शिजवाव्यात. त्यात तेल, मीठ, मसाले ह्यांचा योग्य तेवढाच वापर करा.
* घरासमोर थोडी जागा असेल तर त्या जागेचा वापर आपण परसबागेसारखा करू शकतो. त्यामध्ये कोथिंबीर, पालक, आले. गवती चहा, कारले, घोसावळे, काकडी, दुधी भोपळा लावू शकतो.
कॉपी pest

No comments:

Post a Comment